RSS Feed

Bahinabai Choudhary, बहिणाबाई चौधरी उगवले नारायण

Posted by Monika shinde

 उगवले नारायण, उगवले गगनांत

प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll

उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll

उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll

वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll

हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll

मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll

प्रेम कर भिल्लासारखं

Posted by Monika shinde

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं…

– कुसुमाग्रज