माहेराची वाट बहिणाईंच्या कविता

Posted by Monika shinde

 आज माहेराले जानं

झाली झाली वो पहाट
आली आली डोयापुढे
माझ्या माहेराची वाट

रातदीन गजबज
असं खटल्याचं घर
सदा आबादी  आबाद
माझं 'आसोद' माहेर

माझ्या  माहेराच्या वाटे
तांडे पानाचे लागले
पानं कतरतो बारी
लागे बारीन येचाले

माझ्या माहेराच्या वाटे
रेलवाईचे फाटुक
आगगाडीचं येनंजानं
तिले कशाची आटक?

माझ्या  माहेराच्या  वाटे
"लौकी" लागली लागली
वाटच्या रे वाटसरा
तुझी तहान भागली

माझ्या  माहेराच्या  वाटे
पिव्वी  चिकनास खारी
पानी पावसाया आंधी
जाते धाब्याधाब्यावरी 

माझ्या  माहेराच्या  वाटे
देखा बाभयींच बन
चुल्हा  लहाडीच्यासाठी
घराघरात बैतन

माझ्या  माहेराच्या  वाटे
डाबा पाण्याच्या  लागल्या
म्हशी बसल्या  पान्यात
जशा वरमाई न्हाल्या

माझ्या  माहेराच्या  वाटे
देख मये चारोमेरी

गाडया ऊसाच्या चालल्या
बुधवारच्या  बाजारी 

माझ्या  माहेराच्या  वाटे
घंटया घुंगराचा नाद
येती जाती बैलगाडया
धुरकरी  घाले साद

मांघे पोत्यातून गये
गव्हा  - जवारीची धार
पाखराचा जमे बेत
दाने खाई झाले गार

माझ्या माहेराच्या वाटे
गायी म्हशीचं खिल्लार
गावामधी बरकत
दह्या दुधाची रे ढेर!

माझ्या माहेराच्या वाटे
कोनही भिकारी टकारी
आला भीक मांगीसनी
झोयी गेली समदी भरी 



माझ्या माहेराच्या वाटे
कोनही भीलीन बायजा
खाले उतारली पाटी
म्हने कटेलं लेयजा


माझ्या माहेराच्या वाटे 
जरी आले पायी फोड
पाय चालले चालले
अशी माहेराची ओढ



माझ्या माहेराच्या वाटे 
 जरी  लागल्या  रे ठेचा
वाटवरच्या  या दगडा
तुले फुटली रे वाचा!


“नीट जाय मायबाई
नको करु धडपड
तुझ्याच मी माहेराच्या
वाटवरला दगड!”



माझ्या माहेराच्या वाटे 
 माले लागली गुचकी
आली उडत उडत
एक दीसली, सायंकी 



माझ्या माहेराच्या वाटे 
 मारे सायंकी  भरारी
माझ्या  जायाच्याच आधी
सांगे निरोप माहेरी 


“ऊठ ऊठ भीमामाय
काय घरात बसली
कर गुरमय रोटया
लेक बहिनाई आली!”

0 comments:

Post a Comment